बांधकाम: मंदिराचे सर्व बांधकाम हेमाडपंती स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. प्रत्येक दगड नक्षीने कोरलेला आहे. विविध प्रकारच्या कलाकुसरी या दगडांवर आहेत. मंदिर पूरातन असून त्याचे बांधकाम अहिल्याबाई होळकर यांचे दिवाण श्री चंद्रचूड जहागीरदार यांनी करवून घेतले आहे. मंदिराचे बांधकाम उंचावर असून प्रवेशद्वार उत्तर कडे आहे. प्रवेश द्वारावर भालदार, चोपदाराच्या मूर्ती असून सभामंडपात प्रवेश केल्यावर पूर्वेकडे तोंड केले असता, भव्य गाभाऱ्यात उंच सिंहासनावर शंख, चक्र, गदा, अमृताची कूपी, नाकात नथ, कमरेला कंबरपट्टा, डोक्यावर मुकुट, पायात तोडे व पितांबर परिधान केलेली ४.५ फूट उंचीची भव्य श्री मोहिनीराजांची मूर्ती दृष्टीस पडते व मन प्रसन्न होते. शेजारी श्री लक्ष्मीची मूर्ती आहे.

आख्यायिका: देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथन झाले असता त्यातून १४ रत्ने बाहेर आली. त्यापैकी अमृत हे एक होय. अमृत वाटपाचे काम देवांनी श्री विष्णु कडे सोपवले. श्री विष्णूनी मोहिनीचे रूप घेवून देव आणि दानव यांच्यात अमृत व मदिराचे वाटप युक्तीने केले. देव आणि दानव यांना एकाच पंक्तीत समोरासमोर बसून देवांना अमृताचे वाटप तर दानवांनी सुरा म्हणजेच मदिरेचे वाटप केले. हे फक्त राहू व केतू या दानवांच्या लक्षात आले व ते देवांच्या पंक्तीत येवून बसले. मोहिनीरुप घेतलेल्या विष्णूने त्यांना अमृत दिले परंतु त्यांनी अमृत पिताक्षणी ते भगवान श्री विष्णूंच्या लक्षात आले. स्त्री रूपात सुदर्शन चक्राचे आवाहन करता येणार नाही म्हणून श्री विष्णूंनी अर्धनारी नटेश्वर रूपात सुदर्शन चक्राने राहू व केतू यांचा शिरच्छेद केला. परंतु अमृत प्राशन केले असल्याने त्यांचे शीर अमर झाले. श्री विष्णूने मोहिनीरुप घेवून अमृताचे वाटप केले ते नेवासे येथे. म्हणून श्री मोहिनीराजाचे भव्य मंदिर नेवासे येथे आहे.

उत्सव: श्रींचा उत्सव माघ महिन्यात सुरु होतो. माघ पौर्णिमेच्या दिवशी कुळधर्म कुलाचार करतात. त्याआधी सात दिवस मंदिर प्रांगणात भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. माघ पौर्णिमेनंतर उत्सवमूर्ती पुढे पाच दिवस प्रवरेच्या तिरी पाकशाळा येथे सर्व ग्रामस्थांना दर्शन व औक्षणासाठी ठेवण्यात येते. या उत्सवात भजन, कीर्तन व महाप्रसाद असे कार्यक्रम होतात. उत्सवाची सांगता काल्याने होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *